रविवार, १ नोव्हेंबर, २०१५

बोलतोय खरं

बोलतोय खरं...

अंदाज आरशाचा वाटे खरा असावा

बहुतेक माणसांचा तो चेहरा असावा


या इलाही जमादाराच्या ओळींनी माझ्या नव्या ब्लॉगला सुरवात करीत आहे.

माणसाचे खरे चेहरे शोधण्याचे, मांडण्याचे काम माझ्या कुवतीनुसार, आवाक्यानुसार करीत राहीन.

या वर आपल्याला वाचायला मिळेल...
आपल्या जीवनातील, आजूबाजूचे रोजच्या जीवनातील आशय, विषय, परीपूर्ण किंवा अपूर्ण संगती, विसंगती, गंमती, जंमती,

चित्रे, व्यंगचित्रे, अर्कचित्रे, विचित्रे (ही मात्र आमचीच हं!) येथे दिसत राहतील

आपल्याला (स्मित, गालातल्या गालात, खि..खि.., खु खू...पासून सुरू झालेली हास्याची बाराखडी हा..हा पर्यंत )हसवतील.
आपल्याला आतल्या तोंडाचा (अंतर्मुख) करतील,
कदाचित (शक्य व पेलत असल्यास) विचार करायला लावतील,
जगायला (ये जीना भी क्या जीना है यारो) शिकवतील,
सडेतोडपणे परखड विचार मांडतील. (मग तुम्ही मला फाटक्या तोंडाचा म्हटले तरी चालेल.)
कधी येथे कोपरखळ्या (बायको मारते तशा...)असतील, गुद्दे (शिवसेनेसारखे उगाचच...) किंवा मुद्दे ( कम्यनिष्टासारखे बिनतोड पण व्यहवार्यतेच्या नावानं चांगभलें) असतील
शालजोडीतील काही नमुनेही आहेत म्हटलं आमच्या पोतडीत...( पुण्यात राहिल्याचा एवढा तरी फायदा नको का?)
बाष्कळ, अत्रंगी, जत्रंगी, चत्रंगी विनोदाचेही वावडे नाही...(ग्रामीण भागाशी जोडलेली नाळ अद्याप तुटायचीय हो! च- चमचा, च- च्याकू शिकून राह्यलोय अजून...) 

तुम्हाला प्रश्न पडेल की ही लांबण का लावलीय?
तर सत्याच्या जवळ जाण्यासाठी.
म्हणूनच म्हणतोय,
बोलतोय खरं!

विचार करा...
समजलं, उमजलं तर थाप द्या
पडलं पसंत, तर दाद द्या
राग आला, तर दात खा
काहीच सुचलं नाही, तर मुठी आवळा
शक्य तितक्या जोरानं भांडी घासा,
जोडीदाराची (नवरा असाल, तर बायको अन बायको असेल तर नवऱयाची) शाबासकी मिळेल...
मोठेपणाने त्याचं श्रेय तरी आम्हाला द्या...


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा